आमच्याविषयी

श्री. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, येवला समाजाच्या ssksamajyeola.com या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. येथे श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन महाराजाची माहिती, इतिहास तसेच येवला समाजातील संशोधन, मंदिरे, कार्यालये, समाज वृत्तांत, उपक्रम, इ. माहिती मिळण्याचे ssksamajyeola.com हे संकेतस्थळ एकमेव व्यासपीठ आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!


१६ व्या शतकात येवल्यात येऊन स्थायिक झालेला क्षत्रिय समाज हा एक प्रमुख विणकर समाज आहे. गॅझेटियर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडेन्सी १९८३ मध्ये दिलेल्या माहितीनुसार क्षत्रिय बांधवापैकी काही सिंध प्रांतातील कराची येथून राजस्थान गुजरात मार्गे येवल्यात येऊन स्थायिक झाले. १६ व्या शतकात भारतावर मोगलाचे आक्रमण सुरु झाले. मोगलांनी मोठया प्रमाणावर हिंदुवर अत्याचार करण्यास सुरुवात केलेली. अनेक हिंदुचे बळजबरीने धर्मांतर केले. अशा प्रकारच्या मोगलांच्या अत्याचारास कंटाळून सिंध प्रांतातील क्षत्रिय बांधवानी सिंध प्रांतातून स्थलांतर करून राजस्थान मार्गे मांडवगड, महेश्वर (M.P), तसेच महाराष्ट्रातील नाशिक येवला, सोलापूर, पुणे, सिन्नर, संगमनेर, सातारा, कोल्हापूर, नागपूर इ. भागात येऊन स्थायिक झाले.


सोमवंशीय क्षत्रिय समाजाचा पुरातन इतिहास

प्रत्येक युगात समाजातील अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णूने अवतार घेतला. परशुरामाच्या काळात समाजात अधर्म पसरलेला होता व क्षत्रिय राज्यकर्ते प्रजेवर जुलूम करीत असे. भगवान परशुरामाने अत्याचाराच्या प्रतिशोध घेण्यासाठी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली व जिंकलेली पृथ्वी महर्षी कश्यपांना दान केली. क्षत्रियांची सत्ता गेली, क्षत्रिय निशस्त्र झाले, उपजिविकेचे साधन राहिले नाही. क्षत्रिय समाज हा हिंगलाज मातेची आराधना करीत असत. क्षत्रिय हिंगलाज मातेस शरण गेले व उपजिविकेसाठी काहीतरी उपाय सांगा असे देवीला विनविले, तसेच भगवान परशुरामापासून अभय मिळावे म्हणून देवीची प्रार्थना केली. “ क्षत्रियांनी शस्त्र त्याग केला आहे त्यामुळे तु आता त्यांचा संहार करू नको. ” असे देवीने परशुरामास सांगितले. त्यानुसार परशुरामाने क्षत्रिय संहार थांबविला. हिंगलाज देवीने क्षत्रियांना विणकाम साहित्य देऊन विणकामाचा व्यवसाय सुरु करून उदरनिर्वाह करण्यास सांगितले. तेव्हापासून क्षत्रिय समाजाने विणकाम व्यवसाय सुरु करून त्यात पारंगता मिळविली. सध्याच्या पाकिस्तान या देशाच्या पश्चिमेला बलुचिस्तान हा प्रदेश आहे. तिथल्या मक्रान भागात ओरमारा बंदरापासून आंत १८ ते २० कि.मी. अंतरावर सिंधूनदीच्या मुखापासून ३०० कि.मी. पश्चिमेला हिंगलाज या देवीचे स्थान आहे. व याच भागात क्षत्रिय समाज मोठया संख्येने राहत होता. मोगलांनी १७ व्या शतकात या मंदिराचा विध्वंस केला होता.


सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे आराध्य दैवत - बालेश्वरी माता

येवल्यात आल्यानंतर क्षत्रिय समाजाने हिंगलाज मातेची बाल्य रूप मूर्ती बनवुन तिची उपासना सुरु केली. त्या देवतेला बालेश्वरी म्हणून संबोधले जाते. ईश्वर बालस्वरूप असल्यामुळे बालेश्वरी मातेच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जात नाही. सध्या येथील बालेश्वरी मंदिरातील देवीच्या मूर्तीबद्दल एक आख्यायिका समाजातील जुने जाणकार सांगतात. फार पूर्वी एक शिल्पकार काही संगमरवरी मूर्ती घेऊन येवल्यात आला. समाजातील लोकांना मूर्ती पसंत पडली. परंतु व्यवहार एके न जमल्यामुळे शिल्पकार मूर्ती घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला. ज्या ठिकाणी मुक्कामास थांबला असता देवीने त्या शिल्पकारस दृष्टांत देऊन सांगितले की “ तु मला दुसरीकडे नेऊ नको मला येवल्यातच क्षत्रिय बांधवांकडे राहावयाचे आहे. ” देवीने दृष्टांत दिल्यानंतर शिल्पकार मूर्ती घेऊन येवल्यात परत आला व येथील क्षत्रिय बांधवाना मूर्ती देऊन टाकली समाजाने मोठया आनंदाने जुन्या मूर्तीच्या जागी या नवीन संगमरवरी मूर्तीची स्थापना केली. सुमारे १५० वर्षापूर्वी येवल्यात शंकराचार्य (करवीर पीठ) आले होते. त्यांनी येवल्यातील क्षत्रिय बांधवांना देवीच्या मुर्तीसमोर स्थापित करण्यासाठी एक संगमरवरी श्रीयंत्र दिलेले असून लवकरच त्या श्रीयंत्राची स्थापना मंदिरात करण्यात येणार आहे.

मंदिराचे जिर्णोधाराचे काम पूर्ण झाले असून रविवार दि. २७ ऑक्टोबर २०१३ रोजी आद्यगुरु श्री. शंकराचार्य महाराज (करवीरपीठ कोल्हापूर) यांच्याहस्ते बालेश्वरी मातेची पुनः प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अधिक माहिती...


क्षत्रिय समाजाची उत्सवाची परंपरा

क्षत्रिय समाजात प्रामुख्याने तीन उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. पहिला उत्सव दिननवमीचा असतो. हा दिवस म्हणजे देवीच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस मानला जातो. त्या दिवशी देवीला अभिषेक करून अकरा ब्राह्मणजोडीला भोजन दिले जाते. महत्त्वाचा उत्सव म्हणजे सहस्त्रार्जुन महाराजाची जयंती उत्सव. या दिवशी सहस्त्रार्जुन महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. साधारण ३५ वर्षापासून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तिसरा उत्सव म्हणजे धान पंचमीचा उत्सव. हा आर्य संस्कृतीतील एक उत्सव असून प्रथम आलेले धान्य भगवंताच्या चरणी अर्पण केले जाते. हा नविन वर्षाचा सण असून धन-धान्य समृध्दी व दिर्घारोग समाजाला लाभावे यासाठी मोठया भक्तीभावाने हा सण साजरा केला जातो. महिषासुर मर्दिनी अष्टभुजा बालेश्वरी असल्यामुळे मंदिरात घट:स्थापना करून नऊ दिवस देवीची आरती व इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात. आषाढ महिन्यात मंदीचे वातावरण असल्यामुळे करमणुकीसाठी दशावताराचे रूपे घेऊन आखाडी साजरी करण्याची परंपरा आहे.

‘’महिषासुर मर्दिनी अष्टभुजा बालेश्वरी क्षत्रिय” या संस्थेची पंच कमिटी असून पंचाची अध्यक्षीय परंपरा ही वंशपरंपरागत स्वरुपाची आहे. आजपावेतो झालेले अध्यक्ष पुढील प्रमाणे आहेत.

परशराम सा. वाडेकर (मेहेतर)
गोपाळसा परशरामसा वाडेकर
खेमासा गोपाळसा वाडेकर
नारायण खेमासा वाडेकर
गोविंदसा नारायणसा वाडेकर (विद्यमान अध्यक्ष)